Site Logo
वाशिम जिल्हा

ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!

प्रकाशित: 01 Sep 2026, 07:21 PM
5420 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सोमेश्वर नगर ग्रामपंचायत कार्यालयात  ईश्वर रमेश राठोड यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागण्यासाठी अर्ज साद करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील विविध विकासकामांचा लेखाजोखा, खर्च व संबंधित कागदपत्रांची माहिती या अर्जाद्वारे मागविण्यात आली आहे.

दरम्यान, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचा नेमून दिलेला दिवस असतानाही ते कार्यालयात गैरहजर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता “वाशिम येथे मीटिंग असल्याने येणे शक्य नाही” असे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, ग्रामपंचायत कार्यालयातील हालचाल नोंदवहीमध्ये संबंधित बैठकीबाबत कोणतीही नोंद आढळून आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या उपस्थितीत ईश्वर राठोड यांनी ग्रामपंचायत शिपाई रमेश आडे यांच्याकडे माहितीचा अधिकाराचा अर्ज साद केला. मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली विकासकामे, त्यावरील खर्च, मंजुरी, संबंधित कागदपत्रे आदींची माहिती या अर्जातून मागविण्यात आली आहे.

“ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता हवी; जनतेच्या पैशांचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका अर्जदार व ग्रामस्थांनी घेतली आहे.

आता या माहिती अधिकाराच्या अर्जाला ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन काय उत्तर देतात आणि मागितलेली माहिती नियमानुसार वेळेत उपलब्ध करून देतात का, याकडे सोमेश्वर नगर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू समोर आलेली नाही.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: