Site Logo
वाशिम जिल्हा

घरकुल लाभार्थ्यांकडून ग्रामरोजगार सहाय्यकास मारहाण; कठोर कारवाईची मागणी

प्रकाशित: 28 Aug 2026, 02:04 PM
79 Views
Featured News Image


मानोरा : पंचायत समिती कार्यालय, मानोरा येथे हजेरी पत्रक पासिंगच्या कामासाठी आलेले गादेगाव येथील ग्रामरोजगार सहाय्यक अरविंद सोनोने यांना घरकुल लाभार्थी सुदाम जाधव व पुष्पा चव्हाण यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात अहवाल देण्यात आला असून, संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटना, तालुका मानोरा यांच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाभार्थी सुदाम जाधव यांच्या घरकुल कामाचा वर्क कोड उपलब्ध नसल्याने त्यांचे हजेरी पत्रक काढता येत नव्हते. याबाबत ग्रामरोजगार सहाय्यक तसेच पंचायत समिती स्तरावरून त्यांना वारंवार माहिती देण्यात आली होती. मात्र, याच कारणावरून अरविंद सोनोने यांच्यासोबत वाद घालत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेच्या निषेधार्थ ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेने तहसीलदार मानोरा तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना निवेदन सादर केले. दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून संबंधित ग्रामरोजगार सहाय्यकाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास येत्या आठवड्यापासून संपूर्ण जिल्हा संघटनेच्या वतीने ‘काम बंद आंदोलन’ करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

निवेदनावर पंडित राठोड, विष्णू कटारे, रोहिदास तूनकर, इंद्रगोल राठोड, कैलास जाधव, भारत पवार, गणेश सावके, सुरेश जाधव, विवेक पवार आदी पदाधिकारी तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: