Site Logo
वाशिम जिल्हा

पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवी दिशा!

प्रकाशित: 13 Aug 2026, 05:46 PM
106 Views
Featured News Image

मानोरा, दि. १३ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालकांमधील समन्वय अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सकारात्मक संवादामुळे ही सभा विशेष ठरली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसेन भगत होते, तर पालक प्रतिनिधी म्हणून बाजीराव साबळे उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद मार्गे  यांनी प्रभावीपणे केले. इंगोले मॅडम यांनी प्रास्ताविकातून पालक सभेची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील विविध उपक्रम आणि पालक-शिक्षक सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिस्त, नियमित उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच सर्वांगीण विकासाबाबत उत्स्फूर्तपणे मते व सूचना मांडल्या. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही पालकांनी दिली.

मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी पालकांच्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत करताना, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केले. पालकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीला निश्चितच अधिक बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालक प्रतिनिधी बाजीराव साबळे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचा सकारात्मक सहभाग कायम राहील, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी विकलसिंग राठोड सर यांनी उपस्थित पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा-पालक संवादाला नवी दिशा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन्ही घटकांनी एकत्रितपणे पुढे जाण्याचा सकारात्मक संदेश या पालक सभेतून मिळाला.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: