Site Logo
विदर्भ

नशा, तंबाखू आणि सोशल मीडियाच्या जाळ्यापासून सावध राहा; मुली पळून जाण्याच्या घटनांवर पोलीसांचा इशारा

प्रकाशित: 06 Aug 2026, 07:12 PM
113 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : तरुणाईला नशा, तंबाखू आणि सोशल मीडियाच्या गैरवापराच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी मानोरा पोलीस स्टेशनने गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) व्यापक जनजागृती अभियान राबविले. राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मानोरा येथे दुपारी १ वाजता आयोजित कार्यक्रमात तब्बल ४७० विद्यार्थिनींना नशामुक्त, तंबाखूमुक्त परिसर, मुली पळून जाण्याच्या वाढत्या घटना, तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर व गैरवापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री, फसवणूक, प्रेमाच्या आमिषाला बळी पडणे, वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोणत्याही संशयास्पद प्रकाराची तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.


कार्यक्रमास माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची सामूहिक शपथही विद्यार्थिनींना देण्यात आली.

दरम्यान, याच अभियानांतर्गत वसंतराव नाईक उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळा, विठोली येथेही जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना नशेचे दुष्परिणाम, तंबाखूचे घातक परिणाम, मुलींच्या सुरक्षेचे महत्त्व आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सुरक्षित विद्यार्थी – सुरक्षित समाज हा संदेश देत मानोरा पोलिसांनी शालेय स्तरावर सुरू केलेल्या या अभियानाचे शिक्षक व पालकांनी स्वागत केले असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: