जवारा विसर्जनाने फुलउमरीत तिज उत्सवाची सांगता
मानोरा प्रतिनिधी दि. २९ : बंजारा समाजाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या तिज उत्सवाची फुलउमरी येथे २९ ऑगस्ट रोजी उत्साहात सांगता करण्यात आली. गावातील २७ तांड्यांमध्ये तब्बल दहा दिवस तिज उत्सव विविध पारंपरिक विधी, गाणी आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला
तिज उत्सवाच्या पहिल्या दिवशी तांड्यातील मुली वारुळाची माती आणून बांबूच्या टोपलीत टाकतात. त्यामध्ये गव्हाच्या धान्याची पेरणी करून विहिरीवरून पाणी आणले जाते. तांड्यातील प्रत्येक घरी जाऊन मुली जवाऱ्याला पाणी देत त्याची जोपासना करतात. या माध्यमातून निसर्ग, शेती आणि समृद्धीशी जोडलेली समाजाची पारंपरिक श्रद्धा जपली जाते.
नवव्या दिवशी जवाऱ्याचे विधिवत पूजन करण्यात येते. तसेच राधा-कृष्णाची मूर्ती तांड्यात आणून कारभाऱ्यांच्या घरी तिची स्थापना केली जाते. व रात्रभर जागरण करून महिला मुली गाणे म्हणतात.दहाव्या दिवशी तांड्यातील नाईक, कारभारी, हसाबी, नसाबी, डाए, महिला व युवती एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने तिज तोडण्याचा कार्यक्रम पार पाडतात.
यानंतर दुपारी पारंपरिक डफडे,ढोल-ताशांच्या गजरात राधा-कृष्णाची मूर्ती आणि जवारा मिरवणुकीने नेऊन नाल्यात विसर्जित करण्यात आला. यावेळी महिला व युवतींनी पारंपरिक गाण्यांवर उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘याडी किमेती आयो, याडी खाळीया ये सतळेन ले चालो’ या पारंपरिक गीतातून जवारा विसर्जनाची भावनिक परंपरा व्यक्त होते. या गीताचा आशय म्हणजे कोठून आला आई नाला , माझ्या बहिणीला (जवारा) पाण्यासोबत वाहून नेत आहे असा असून, त्यामागे तिज उत्सवातील भावनिक निरोपाची भावना दडलेली आहे.
तिज उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा, निसर्गाशी असलेले नाते आणि सामाजिक एकोपा आजही जपला जात असल्याचे यावेळी दिसून आले.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मानोरा खरेदी-विक्री संस्थेची वार्षिक आमसभा उत्साहात संस्थेच्या विकासासह सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
03 Sep 2026
तांडा-पाड्यांपर्यंत संविधानाचा जागर; तांडा सुधार समिती घेणार संविधान संमेलन
31 Aug 2026
दोन दमदार पावसाची आस; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे ऐन काढणीच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने बहरलेले पीक हातातून जाण्याची भीती
30 Aug 2026
बळीराजासाठी भरपूर पावसाची बापू समाधीस्थळी आरदास ; पोहरादेवीत हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप
29 Aug 2026