Site Logo
विदर्भ

तांडा-पाड्यांपर्यंत संविधानाचा जागर; तांडा सुधार समिती घेणार संविधान संमेलन

प्रकाशित: 31 Aug 2026, 10:04 PM
619 Views
Featured News Image

पोहरादेवी दर्शन वृत्त : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होऊनही तांडा-पाड्यांमध्ये राहणाऱ्या जनतेपर्यंत संविधानाची मूल्ये आणि संविधानिक हक्क अपेक्षित स्वरूपात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक आजही आपल्या मूलभूत हक्कांपासून आणि अधिकारांपासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने तांडा-पाड्यांमध्ये संविधानिक जनजागृती करण्यासाठी लवकरच ‘संविधान संमेलन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड आणि महासचिव नामा बंजारा यांनी ही माहिती दिली. नुकतीच महासचिव नामा बंजारा यांच्या निवासस्थानी समितीच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत तांडा-पाड्यांतील नागरिकांना संविधानातील हक्क, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची माहिती देण्यासाठी संविधान संमेलनांची शृंखला आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आजही समाजातील अनेक घटकांना शासकीय योजना, मूलभूत अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पुरेशी माहिती नसते. परिणामी, माहितीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा आपल्या हक्कांपासून दूर राहावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी तांडा सुधार समितीच्या माध्यमातून संविधान जनजागृतीला सामाजिक चळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कार्यकारिणीतही होणार फेरबदल

अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या कार्यकारिणीत अधिकाधिक विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि संवैधानिक मूल्यांची जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यासाठी लवकरच विविध स्तरांवरील कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने प्रा. सरदार राठोड यांनी सांगितले.

केंद्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी तसेच विविध जिल्ह्यांच्या कार्यकारिण्यांमध्ये कोणकोणते बदल होणार, याकडे समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

संविधान समजले तरच हक्कांची लढाई मजबूत

तांडा-पाड्यातील सामान्य नागरिकांना संविधान केवळ पुस्तकात न राहता दैनंदिन जीवनाचा आधार आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून समजावे, हा संविधान संमेलनामागील मुख्य उद्देश आहे. संविधानिक अधिकारांची जाणीव झाल्यासच अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची आणि लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची ताकद समाजात निर्माण होईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

तांडा-पाड्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करून जागरूक, प्रश्न विचारणारा आणि आपल्या अधिकारांसाठी सजग नागरिक घडविण्याच्या दिशेने तांडा सुधार समितीने पाऊल टाकले आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा:

संबंधित बातम्या