Site Logo
विदर्भ

दोन दमदार पावसाची आस; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे ऐन काढणीच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने बहरलेले पीक हातातून जाण्याची भीती

प्रकाशित: 30 Aug 2026, 10:43 AM
72 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : यंदा पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनचे पीक सध्या चांगले बहरले असून अनेक शेतांमध्ये झाडांना ८० ते ९० शेंगा लागल्या आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पोहरादेवी येथील शेतकरी संजय पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पीक सध्या चांगलेच बहरले आहे. झाडांना मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या असून पीक समाधानकारक स्थितीत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेंगा भरण्याच्या काळात पिकाला आवश्यक ओलावा मिळत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे विहिरी, नाले तसेच जलसाठ्यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नाही. विहिरींमध्ये पाणी साठा नसल्याने शेतकऱ्यांना पर्यायी सिंचन करणेही कठीण झाले आहे. परिणामी पावसावर अवलंबून असलेल्या सोयाबीन पिकाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे.

सध्या सोयाबीनला केवळ दोन जोरदार पावसांची गरज आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला तर शेंगा व्यवस्थित भरून शेतकऱ्यांच्या घरात चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने आणखी दडी मारल्यास बहरलेले पीक हातातून जाण्याची भीती आहे.

त्यामुळे शासनानेही पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: