धरणातील विहीर खचली; प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
मानोरा : खटकाळी धरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर नगर येथील धरणातील सिंचनासाठी बांधण्यात आलेली विहीर एका बाजूने मोठ्या प्रमाणात खचली असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही विहीर कधीही पूर्णपणे जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही विहीर तात्काळ दुरुस्त न केल्यास भविष्यात कॅनलद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्यावर गंभीर परिणाम होऊन सिंचनाची सोयच बंद पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लघु सिंचन विभागाच्या देखभाल व दुरुस्तीअंतर्गत असलेल्या या धरणाकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे. विहीर खचल्याची बाब निदर्शनास आणून देऊनही नागरिकांनी वेळोवेळी सिंचन विभागाकडे निवेदने देत दुरुस्तीची मागणी केली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
विहीर आणखी खचून पूर्णपणे कोसळण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिंचन व्यवस्थेचा कणा असलेल्या या विहिरीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी झोपेतून जागे होऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव; लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धरणातील खचलेल्या विहिरीचा मुद्दा मांडून सर्वानुमते ठराव पारित करण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तात्काळ विहीर दुरुस्त करून सिंचनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास गावकरी रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
“वेळीच विहीर दुरुस्त केली नाही तर ती पूर्णपणे खचून जमीनदोस्त होऊ शकते. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे सिंचनाचे पाणी बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल.”
— संतोष मदन जाधव, शेतकरी, सोमेश्वर नगर
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026