तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांचा घणाघात! सेवादासनगरात धडक कारवाई; २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
मानोरा : गावखेड्यातील तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या अवैध हातभट्टीविरोधात मानोरा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सेवादासनगर येथे पोलिसांनी शनिवारी कारवाई करीत तब्बल २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या राहत्या घराच्या गोठ्यात सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मानोरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पंचांसमक्ष सेवादासनगर येथील भीमराव हिरासिंग जाधव यांच्या घराच्या गोठ्याची झडती घेतली. यावेळी सहा प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी ३०० लिटरप्रमाणे तब्बल १ हजार ८०० लिटर सडवा मोहमाच, तीन टोपल्यांमध्ये १५० लिटर सडवा मोहमाच, एका कॅनमध्ये १०० लिटर गावरान हातभट्टी दारू, तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
## व्यसनाच्या आहारी जाणारी तरुणाई चिंतेचा विषय
गावोगावी सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्या केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून त्याचा थेट परिणाम समाजाच्या आरोग्यावर होत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या स्वस्त दारूमुळे अनेक तरुण अल्पवयातच व्यसनाच्या आहारी जात असून, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर आणि सामाजिक जीवनावर होत आहे. व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, कमी वयात गंभीर आजारांना सामोरे जाण्याचे तसेच अकाली मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
## हातभट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाईची गरज
अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, केवळ छापेमारी न करता अवैध हातभट्ट्यांचे मूळ शोधून त्यांच्यावर सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. विशेषतः तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांसह प्रशासन, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे गरजेचे आहे.
सेवादासनगरातील या कारवाईमुळे गाव परिसरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, ‘व्यसनमुक्त गाव’ घडविण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मानोऱ्यात शहाणे ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला! शहाणे यांच्या सतर्कतेमुळे लाखोंचा ऐवज वाचला; गॅस कटरसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
30 Aug 2026
जुगारावर पोलिसांचा छापा; चौघांवर गुन्हा दाखल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
29 Aug 2026
वारंटमधील आरोपींची आता खैर नाही! मानोरा पोलिसांची धडक मोहीम; तिघांना अटक करून न्यायालयात हजर
29 Aug 2026
बकऱ्या चोरल्या अन् थेट तुरुंगात! चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
13 Aug 2026