Site Logo
अध्यात्म

हर हर महादेवच्या जयघोषात कावड यात्रेचा जल्लोष सोमनाथ मंदिरात जलाभिषेक

प्रकाशित: 31 Aug 2026, 08:29 PM
133 Views
Featured News Image

 मानोरा:-- शहरातील जय वीर हनुमान कावड मंडळ (जुनी वस्ती) आणि धामणी येथील सोनपाकू महाराज कावड मंडळाच्या वतीने सोमवारी (३१ ऑगस्ट) कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आसोला येथील सोमनाथ महाराज मंदिरात जलाभिषेक केला. यावेळी बळीराजावरील इडा-पीडा टळावी, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभावी आणि परिसरात भरपूर पाऊस पडावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

                                                       कावड यात्रेला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. त्यापूर्वी जय वीर हनुमान कावड मंडळाच्या वतीने अरुणावती नदीतून ५१ भरणे पवित्र जल भरण्यात आले. जलभरण करण्यापूर्वी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, गोपाल लढा, संजय हेडा, पोलीस पाटील गोपाल लाहोटी, गोविंदा काजळे, प्रवीण छालीवाल, तिवारी महाराज, नवरतन पांडिया, पंडित जोशी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरती केली. त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात कावड यात्रेला सुरुवात झाली.

जुनी वस्ती, पोलीस स्टेशनमार्गे कावड यात्रा दिग्रस चौकात पोहोचली. येथे ठाणेदार नैना पोहेकर यांनी कावडचे विधिवत पूजन केले. यावेळी कावड मंडळाचे प्रमुख करण ठाकूर यांचा ठाणेदार पोहेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे,तेजस्विनी डहाके, संजय राठोड, राजू गुल्हाने, आशिष पाटील, गोपाल हेडा, वीरू राठोड, अरुण राठोड आदिनी कावडचे पूजन केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

                                                                  दुपारी १.३० वाजता कावड यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आली यावेळी गणेश जामदार यांच्यासह नागरिकांनी कावडचे पूजन करून भाविकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली. सोमठाणा, सोमनाथनगर व गव्हा येथेही भाविकांसाठी मंडप उभारून चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

# डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह

कावड यात्रेत तरुणांचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. डीजेच्या तालावर तरुण युवकांनी ठेका धरत भक्तिमय वातावरणात आनंद व्यक्त केला. गव्हा गावासमोरील मार्गावर सेवाभावी नागरिकांनी ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली.

सायंकाळी कावड यात्रा आसोला चौकात पोहोचली. येथे कावड मंडळातील भाविकांसाठी खिचडी, चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर कावड यात्रा सोमनाथ महाराज मंदिरात पोहोचताच विधिवत आरती करण्यात आली. भाविकांनी सोमनाथ महाराजांना पवित्र जलाचा अभिषेक करून बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी व चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. आरतीनंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

                                                                                                                                                                                                                श्रद्धेसोबत सामाजिक एकतेचा संदेश

कावड यात्रेला यंदा हजारो युवक व भाविकांनी सहभाग नोंदविला. धार्मिक श्रद्धेसोबतच सेवाभावी नागरिकांनी केलेली चहा-पाणी व नाश्त्याची व्यवस्था ही सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारी ठरली. विविध समाजघटकांनी भाविकांचे स्वागत करून सर्वधर्म सलोखा, सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचा संदेश दिला.

पोलीसांचा चोख बंदोबस्त

कावड यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कावड यात्रा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

नवसाला पावणारे कावड मंडळ अशी श्रद्धा

जय वीर हनुमान कावड मंडळ व सोनपाकू महाराज कावड मंडळाच्या कावड यात्रेला धार्मिक महत्त्व असून, नवसाला पावणारी कावड यात्रा म्हणून अनेक भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याचे दिसून आले.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: