बंजारा अस्मितेचा भव्य वारसा; पोहरादेवीतील नंगारा म्युझियम ठरते आकर्षणाचे केंद्र!
मानोरा प्रतिनिधी : बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आणि बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे साकारण्यात आलेले ‘बंजारा विरासत’ नंगारा वस्तुसंग्रहालय सध्या भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी या भव्य वास्तूचे लोकार्पण झाले. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर देशभरातील बंजारा समाजामध्ये या वास्तूबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक नंगारा म्युझियमला भेट देत आहेत.
या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण, बंजारा धर्मगुरू तथा आमदार बाबूसिंग महाराज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यवतमाळ-वाशिमचे तत्कालीन पालकमंत्री तथा या प्रकल्पाचे संकल्पक संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर, खासदार, आमदार, विविध राज्यांतील बंजारा लोकप्रतिनिधी, धर्मगुरू, महंत आणि समाजबांधवांची उपस्थिती होती.
बंजारा समाजाच्या इतिहासाची साक्ष देणारी वास्तू
पोहरादेवी हे देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. येथे संत सेवालाल महाराजांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी तसेच आई जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीचा एकत्रित परिचय व्हावा, या उद्देशाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत ‘बंजारा विरासत’ नंगारा वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली.
या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१८ मध्ये झाले होते. पारंपरिक बंजारा संस्कृती आणि आधुनिक वास्तुकलेचा सुरेख मेळ साधत तब्बल १६ एकर परिसरात ही भव्य वास्तू साकारण्यात आली आहे.
पाच मजली वास्तू; १३ गॅलरींतून संस्कृतीचे दर्शन
नंगारा वस्तुसंग्रहालय पाच मजली असून, त्यामध्ये तब्बल १३ विविध गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. या गॅलरींमधून बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, वेशभूषा, लोकजीवन, सांस्कृतिक वारसा आणि विविध परंपरांचे दर्शन घडते. पारंपरिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना वेगळी अनुभूती मिळत आहे.
संग्रहालयातील माहिती विविध सात भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांना बंजारा समाजाचा इतिहास समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नंगारा म्युझियमच्या वैशिष्ट्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विशेष लक्षवेधी ठरतो. येथे फ्लाईंग थिएटर, मूव्हिंग प्लॅटफॉर्म आणि रमलिंग प्लॅटफॉर्मसारख्या आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ वस्तू पाहण्याऐवजी इतिहास आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याची भावना पर्यटकांना होते.
नंगारावर तब्बल १६० फूट बाय ३० फूट आकाराची भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आली आहे. या स्क्रीनवरील दृश्ये सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरूनही पाहता येतात. परिसरात १५० फूट उंच सेवाध्वज उभारण्यात आला असून, संत सेवालाल महाराजांचा आकर्षक अश्वारूढ पुतळाही येथे साकारण्यात आला आहे
लेझर शो ठरतो आकर्षणाचा केंद्रबिंदू
उत्सवाच्या काळात नंगारा परिसरात सायंकाळी ७ वाजल्यापासून लाईट अँड साउंड शो तसेच लेझर शोचे आयोजन केले जाते. प्रकाश, ध्वनी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास व सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर केला जातो. त्यामुळे सायंकाळच्या वेळी या परिसरात पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते.
९० मिनिटांत बंजारा संस्कृतीचा प्रवास
नंगारा म्युझियमचा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी साधारण ९० मिनिटांचा कालावधी लागतो. संग्रहालयातील विविध गॅलरी, आधुनिक सादरीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि वास्तुकलेची वैशिष्ट्ये यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाची ओळख होते.
पारंपरिक वास्तुकलेची प्रेरणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही वास्तू देशातील आगळ्यावेगळ्या वस्तुसंग्रहालयांपैकी एक म्हणून ओळख निर्माण करीत आहे.
भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकार्पण झाल्यानंतर नंगारा वस्तुसंग्रहालय भाविक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर या वास्तूला भेट देणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. पोहरादेवीला दर्शनासाठी येणारे भाविक संत सेवालाल महाराजांची समाधी, आई जगदंबा मंदिरासोबतच नंगारा म्युझियमला आवर्जून भेट देत आहेत.
दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि समाजबांधवांची उपस्थिती असल्याने पोहरादेवीच्या धार्मिक पर्यटनाला या वास्तूमुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक दिवस बंद
इतक्या मोठ्या परिसरातील स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थित राखता यावी, यासाठी संग्रहालय आठवड्यातून बुधवारी बंद ठेवण्यात येते. उर्वरित दिवसांत भाविक व पर्यटकांना संग्रहालय पाहता येते.
बंजारा समाजाच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियम हे केवळ वस्तुसंग्रहालय नसून समाजाच्या इतिहास, अस्मिता आणि सांस्कृतिक वैभवाची भव्य ओळख बनत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News