Site Logo
महाराष्ट्र

यवतमाळ-वाशिमच्या रस्त्यांसाठी केंद्रीय निधी द्या खा. संजय देशमुख यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी; वाशिम रिंगरोडलाही निधी देण्याचे साकडे

प्रकाशित: 30 Jul 2026, 04:42 PM
131 Views
Featured News Image

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील खराब व महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (CRF) तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दि. २९ जुलै रोजी भेट घेऊन केली.

मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, त्याचा मोठा फटका नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच वाहनधारकांना बसत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांकडे विशेष लक्ष देऊन केंद्रीय निधीतून तातडीने तरतूद करावी, अशी विनंती खासदार देशमुख यांनी केली.

यावेळी वाशिम शहरासाठी प्रस्तावित रिंग रोडच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीही रिंग रोडसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला होता. रिंग रोडच्या निर्मितीमुळे वाशिम शहरातील वाढती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

लोकहिताच्या या महत्त्वपूर्ण मागण्यांना प्राधान्य देऊन संबंधित रस्ते विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केली.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: