Site Logo
साहित्यिक

वाचनातून लेखनाकडे... ‘याडीकार’ म्हणून गोर साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण करणारे पंजाबराव चव्हाण

प्रकाशित: 02 Sep 2026, 07:19 AM
336 Views
Featured News Image

पोहरादेवी दर्शन वेब पोर्टल न्यूज : विशेष प्रतिनिधी शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड जोपासत, प्रतिकूल परिस्थितीतही ज्ञानाची भूक जिवंत ठेवत आणि पुढे लेखणीच्या माध्यमातून गोरबंजारा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारे याडीकार पंजाबराव लालसिंग चव्हाण यांनी आपल्या लेखनातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जेष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक आणि राजकीय विश्लेषक म्हणून परिचित असलेल्या पंजाबराव चव्हाण यांच्या साहित्यप्रवासामागे संघर्ष, वाचन, चिंतन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

वाचनालयातून सुरू झाला साहित्यप्रवास

७ जून १९६२ रोजी जन्मलेल्या पंजाबराव चव्हाण यांचे शिक्षण एम.ए. (मराठी) पर्यंत झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. मात्र पुस्तके खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ते वाचनालयात जाऊन पुस्तके वाचत असत. हीच वाचनाची सवय पुढे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.

सन १९८५ मध्ये त्यांना ग्रामसेवक म्हणून नोकरी मिळाली. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नोकरी करत असतानाही त्यांची वाचनाची सवय कायम राहिली. सन १९९४ मध्ये पुसद येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या लेखनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

सन १९९९ मध्ये त्यांनी महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवनावर पहिला लेख लिहिला. हा लेख पुसद येथील ‘जनमत’ या स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाला. या लेखाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या लेखणीला आत्मविश्वास मिळाला आणि पुढील साहित्यप्रवासाची दिशा निश्चित झाली.

‘याडी’ने दिली ‘याडीकार’ ही ओळख

सन २००३ मध्ये उमरखेड येथे पहिले अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करण्याची परंपरा असल्याने आंतरराष्ट्रीय लेखक भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी पंजाबराव चव्हाण यांना पुस्तक लिहिण्याची सूचना केली.

‘साहित्य लेखन आपल्या आवाक्याबाहेरचे आहे’, असे म्हणत त्यांनी सुरुवातीला नम्रपणे नकार दिला. मात्र मोहन नाईक यांनी त्यांचा आग्रह सोडला नाही. ‘काही जमत नसेल तर तू तुझ्या याडीबद्दल लिही; बाकी मी बघतो’, असा विश्वास त्यांनी दिला. या विश्वासातून पंजाबराव चव्हाण यांनी ‘याडी’ हे आत्मकथन लिहिले.

११ जानेवारी २००३ रोजी उमरखेड येथे झालेल्या गोरबंजारा साहित्य संमेलनात ‘याडी’चे प्रकाशन झाले. याच वेळी भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी पंजाबराव चव्हाण यांची यापुढे ‘याडीकार पंजाबराव चव्हाण’ अशी ओळख राहील, अशी घोषणा केली. तेव्हापासून ‘याडीकार’ हीच त्यांची साहित्यिक ओळख बनली.

स्वतःच्या लेखनाचे श्रेय ते आजही भीमणीपुत्र मोहन नाईक यांना देतात. त्यांच्या मते, ‘माझ्या संपूर्ण लिखाणामागे मोहन नाईक साहेबांचा विश्वास आणि प्रेरणा आहे.’

विपुल साहित्यनिर्मितीचा प्रवास

याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी आतापर्यंत विविध विषयांवर २३ पुस्तके प्रकाशित केली आहेत. आत्मकथन, लेखसंग्रह, समीक्षा, इतिहास, चरित्र, संविधान, आरक्षण आणि गोरबोली साहित्य अशा विविध विषयांना त्यांनी आपल्या लेखणीतून स्पर्श केला आहे.

त्यांच्या प्रमुख प्रकाशित साहित्यामध्ये—

याडी – आत्मकथन,बंजारा समाजदर्शन – लेखसंग्रह,बंजारा हस्तकलेची शोकांतिका! – लेखसंग्रह

शिकारी राजा – सुधाकरराव नाईक यांचे जीवनचरित्र,मी डॉ. बाबासाहेब आंबेडकराकडे का वळलो? – लेखसंग्रह

अंतःस्वर – गोरबोली समीक्षा ग्रंथ .गोरबंजारा लेखक/कवी यांची साहित्य सूची

झगर – गोरबोली लेखसंग्रह ,क्रांतीसूर्य : संत सेवालाल महाराज – ऐतिहासिक ग्रंथ

सरपंच/ग्रामसेवक मार्गदर्शिका,दूत आरक्षणाचा – हरिभाऊ राठोड यांचे जीवनचरित्र

आपले संविधान आपले हक्क,महायोद्धा लखीशा बंजारा,शूरवीर शहीद शीख बणजारा

गोर इतिहासातील शूरवीर नायक,संघर्षवीर – प्रा. चंद्रकांत काळूराम पवार यांचे चरित्र

लोकनायक वसंतराव नाईकसाहेब',क्रांती – गोरबोली कविता संग्रह

झाडाझडती – लेखसंग्रह,गोर साहित्याचे समीक्षात्मक विश्लेषण,आरक्षणाचा इतिहास

जनगणना झालीच पाहिजे?,महाराणा प्रताप

याशिवाय गोर बंजारा समाजाची दशा आणि दिशा, बेधडक आमदार, रोखठोक, गोर बंजारा समाजाचा सामाजिक आणि सांस्कृतिक एल्गार, गोरबंजारा आरक्षणाचा इतिहास, शूरवीर सामत दादा, गोर बंजारा जनरल नॉलेज, पोहरागडाचा इतिहास, निसर्ग पूजक गोरमाटी!, दखल, लक्षवेधी, भटक्या-विमुक्तांच्या आरक्षणाचा इतिहास यांसह अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

लेखनाचा मोठा आवाका

याडीकार पंजाबराव चव्हाण यांच्या लेखणीची व्याप्ती त्यांच्या लेखनाच्या संख्येतूनही दिसून येते. त्यांनी आतापर्यंत ५५५ लेख, गोरबोलीतील ४१ कविता, मराठीतील ९ कविता, १० गोर साकी, २० विशेष मुलाखती, ९९ पुस्तक समीक्षा, १५ लोकसभा आढावा लेख, २० लोकसभा बुलेटीन, १२ विधानसभा निवडणूक आढावा लेख, ५१ झाडाझडती लेख, ४५ झगर गोरबोली लेख आणि ५ कवितांचे रसग्रहण केले आहे.

लेखनासोबत सामाजिक प्रबोधन

लेखनापुरते मर्यादित न राहता पंजाबराव चव्हाण यांनी सामाजिक प्रबोधनालाही आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानले. सन २००० मध्ये व्यसनमुक्तीच्या माध्यमातून १९ व्यक्तींना दारूमुक्त करण्याचे कार्य त्यांनी केले.

संविधान जागरूकता अभियानाच्या माध्यमातून जवळपास १०० तांड्यांमध्ये व्याख्याने देत ‘आपले संविधान आपले हक्क’ या पुस्तकाचे वाटप केले. हुंडाबंदी, तेरवी प्रथा, अंधश्रद्धा निर्मूलन, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा तसेच संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज आणि महानायक वसंतराव नाईक यांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक गाव-तांड्यांमध्ये प्रबोधन केले आहे.

सन्मान आणि पुरस्कारांची मोठी परंपरा

त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची विविध संस्थांनी दखल घेतली आहे. बंजारा भूषण पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, व्यसनमुक्ती पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार, राष्ट्रीय जनसेवा लोक गौरव सन्मान, वसंतराव नाईक बंजारा भूषण पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, गोरसेवा पुरस्कार, बंजारारत्न पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या ‘याडी’ आत्मकथनालाही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, स्व. दया पवार आत्मकथन पुरस्कार, अंकुर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि गोर बंजारा लुभाना रत्न आदी सन्मानांचा समावेश आहे.

‘याडी’ या आत्मकथनाला विविध मान्यवर साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून गौरवास्पद अभिप्रायही मिळाले आहेत.

सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय सहभाग

याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे संस्थापक सदस्य व माजी जिल्हा सचिव, गोरबंजारा साहित्य संघ उमरखेडचे माजी सरचिटणीस, गोरबंजारा महाराज परिषद उमरखेडचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र संत सेवालाल महाराज विश्वस्त मंडळाचे सल्लागार, मातोश्री सुंदल ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष, लालसिंग नाईक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, बंजारा साहित्य अकादमी पोहरागडचे उपाध्यक्ष तसेच याडी फाऊंडेशन पुसदचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

‘साहित्यिक होण्यापेक्षा लिहित राहणे महत्त्वाचे’

आपल्या लेखनाबाबत पंजाबराव चव्हाण अत्यंत नम्रपणे सांगतात की, ‘मी खऱ्या अर्थाने लिहिता झालो; मात्र स्वतःला साहित्यिक किंवा लेखक म्हणवून घेण्यापेक्षा लेखनाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडणे मला महत्त्वाचे वाटते.’

वाचनातून निर्माण झालेली जिज्ञासा, अनुभवातून आलेली संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे याडीकार पंजाबराव चव्हाण यांची लेखणी आजही अविरत सुरू आहे. गोरबंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, साहित्य, सामाजिक प्रश्न आणि हक्क यांचा शोध घेत त्यांच्या लेखणीने उभा केलेला साहित्यिक ठेवा निश्चितच अभ्यासक आणि नव्या पिढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.


Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: