राष्ट्रसंत डॉ. रामरावबापू महाराजांच्या ९१ व्या जन्मोत्सवानिमित्त ५० हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती; तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह राज्यभरातून पायदळ पालख्यांचे आगमन
पोहरादेवी : गुरुपौर्णिमेनिमित्त बहुजन काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे राष्ट्रसंत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या ९१ व्या जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात पार पडला. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभरात विविध भागांतून आलेल्या पायदळ पालख्यांमुळे संपूर्ण परिसर जय सेवालाल,जय रामरावबापूच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
सकाळी ८.३० वाजता बापू समाधीस्थळी पाळणा गीत, महाआरती, आरदास व विधिवत भोगविधी पार पडला. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांनी आरदास करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यानंतर बापू समाधीस्थळ आणि बापू आश्रमात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
राज्यभरातून आलेल्या पायदळ पालख्यांच्या प्रमुखांचा धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज व देविभक्त शेखर महाराज यांनी शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु पूजनासाठी बाबुसिंग महाराज यांच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. दिवसभरात सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
कायदो व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरून आलेल्या ४० पोलिस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
रक्तदानातून गुरुसेवेचा संदेश
वाशीम येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात बुधवारी ३० हून अधिक भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
संस्थान व भक्तीधामातही धार्मिक कार्यक्रम
जगदंबादेवी बाबनलाल महाराज संस्थान येथे २८ जुलै रोजी बंजारा भजन संध्या पार पडली. गुरुपौर्णिमेदिनी महंत सुनील महाराज व अनिल महाराज यांच्या हस्ते भोगविधीनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच सहभागी भजनी मंडळांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
भक्तीधाम येथे २८ जुलै रोजी पंकजपाल महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमानंतर बुधवारी महंत जितेंद्र महाराज यांच्या हस्ते आरदास व भोगविधी पार पडला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
## धार्मिकतेसोबत समाजसेवेचाही संदेश
गुरुपौर्णिमा महोत्सवात गुरुसेवा, रक्तदान, महाप्रसाद, भजन-कीर्तन आणि समाजप्रबोधन अशा विविध उपक्रमांचा संगम पाहायला मिळाला. त्यामुळे पोहरादेवीत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026