Site Logo
महाराष्ट्र

नगारा म्युझियमला महाराजांचा टाळा; तिकीट दर कमी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

प्रकाशित: 04 Aug 2026, 09:53 PM
256 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : पोहरादेवी येथील जगप्रसिद्ध नगारा म्युझियमच्या तिकीट दरावरून वाद अधिक तीव्र झाला असून, तिकीट दर २०० रुपयांवरून १०० रुपये करण्यात यावा या मागणीसाठी महंत जितेंद्र महाराज आणि महंत कबीरदास महाराज यांनी म्युझियम व तिकीट घराला टाळा ठोकत आंदोलन छेडले आहे. १७ ऑगस्टपर्यंत तिकीट दर कमी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराजांनी सांगितले की, देशभरातून तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक आणि पर्यटक पोहरादेवी येथे येत असतात. बंजारा समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक कुटुंबे नगारा म्युझियमला भेट देतात. मात्र, सध्या असलेला २०० रुपयांचा तिकीट दर सामान्य भाविक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी जास्त असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यापूर्वी सुमारे एक महिन्यापूर्वी महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज तसेच अनेक भाविकांनी जिल्हा प्रशासनाकडे तिकीट दर १०० रुपये करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांसाठी तिकीट दर १०० रुपये केला होता. मात्र, पुन्हा तिकीट दर २०० रुपये करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्यातून हे आंदोलन उभे राहिले आहे.

आंदोलनादरम्यान महंत जितेंद्र महाराज आणि महंत कबीरदास महाराज यांनी, जोपर्यंत तिकीट दर १०० रुपये होत नाही तोपर्यंत राज्यभरातील आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी नगारा म्युझियम पाहण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.

"भाविक आणि पर्यटकांच्या हितासाठी तिकीट दर कमी करणे आवश्यक आहे. १७ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर नगारा म्युझियमसमोर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल," असा इशारा आंदोलनकर्त्या महाराजांनी दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे पोहरादेवी परिसरात तिकीट दराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे भाविक व पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

पोहरादेवी येथील नगारा भवन (म्युझियम) तिकीट दराबाबत प्राप्त झालेल्या विविध निवेदनांची दखल घेत, संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रकल्प सनियंत्रण समितीच्या ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ३ ऑगस्ट २०२६ रोजी सात सदस्यीय संयुक्त तपासणी समितीची स्थापना केली आहे. ही समिती तिकीट दर, व्यवस्थापन व संबंधित बाबींची सखोल तपासणी करून आपला अहवाल सादर करणार असून, त्यानंतर तिकीट दराबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे."

राजेंद्र पाटील तहसीलदार तथा तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रकल्प सनियंत्रण समिती सदस्य मानोरा


कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी नगारा म्युझियम परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले."यावेळी कारंजा  उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे, ठाणेदार नैना पोहेकर, साहाय्यक पोलीस अधिकारी रामबाबू सरोदे, पवार, दंगा नियंत्रण पोलीस पथक व १५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ठाणेदार नैना पोहेकर ठाणेदार मानोरा




Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: