Site Logo
देश /विदेश

दिल्लीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी देशभरातील पत्रकार, संपादक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वपूर्ण ठराव होणार मंजूर

प्रकाशित: 26 Jul 2026, 05:26 PM
143 Views
Featured News Image

नवी दिल्ली  | प्रतिनिधी देशाची राजधानी नवी दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात २७ व २८ जुलै रोजी होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि *‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’*च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून देशभरातील पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ आणि विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची दिल्लीत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लागली आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर व्यापक मंथन करून त्यांच्या हितासाठी ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार असल्याने या अधिवेशनाकडे पत्रकारिताक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनात भारतीय पत्रकारितेची सद्यस्थिती, बदलते माध्यमविश्व, डिजिटल पत्रकारितेची आव्हाने, माध्यमांची विश्वासार्हता, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांचे सामाजिक व आर्थिक हक्क, पत्रकार कल्याण योजना, फेक न्यूजवरील नियंत्रण, माध्यम नीतिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभाव अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परिसंवाद आणि मुक्त चर्चा होणार आहे. विविध राज्यांतील यशस्वी उपक्रमांची देवाणघेवाण करून पत्रकार संघटनांना अधिक सक्षम करण्यासाठी कृती आराखडाही निश्चित केला जाणार आहे.

या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पत्रकारांच्या सुरक्षा, सन्मान, सामाजिक संरक्षण, आर्थिक स्थैर्य आणि कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेले ३० महत्त्वपूर्ण ठराव. हे ठराव केंद्र सरकारकडे सादर करून पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे अधिवेशन निमंत्रित पदाधिकारी व पत्रकारांसाठीच आयोजित करण्यात आले आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील प्रतिनिधींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अधिवेशनातून पत्रकारांची एकजूट अधिक बळकट होऊन भारतीय पत्रकारितेला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांचा आवाज अधिक बुलंद होईल – अनिल म्हस्के

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, “देशाची राजधानी दिल्ली येथे होणारे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येथे मंजूर होणारे ठराव पत्रकारांचा आवाज राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचवतील. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”

पत्रकार चळवळीला नवी दिशा – विजय चोरडिया

‘व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक विजय चोरडिया यांनी सांगितले की, “हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकार संघटनांना अधिक सक्षम करणारे, पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे आणि केंद्र सरकारशी प्रभावी संवाद साधण्यासाठी भक्कम पाया घालणारे ठरेल. यामुळे देशभरातील पत्रकारांमध्ये समन्वय, व्यावसायिक ऐक्य आणि संघटनात्मक बळकटी अधिक दृढ होईल.”

देशभरातून प्रतिनिधींची उपस्थिती

आंध्र प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिशा, पंजाब, पुदुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य या अधिवेशनात सहभागी होत असून पत्रकारांच्या प्रश्नांवर एकत्रित भूमिका मांडण्यासाठी सर्व राज्यांचे प्रतिनिधी सज्ज झाले आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: