बापूंच्या ९१ व्या जयंतीची जय्यत तयारी; पोहरादेवीत १५ क्विंटल बुंदी लाडूंचा महाप्रसाद
मानोरा : अखंड ब्रह्मचारी संत डॉ. रामराव महाराज (बापू) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बापू समाधी स्थळी देविभक्त महंत शेखर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी तब्बल १५ क्विंटल बुंदीच्या लाडूंचा महाप्रसाद तयार करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील संघारेड्डी जिल्ह्यातील पुजारी व आचार्य यांच्या सहकार्याने शनिवारी (२६ जुलै) सकाळी १० वाजल्यापासून लाडू बनविण्याचे काम सुरू झाले.
गेल्या पाच वर्षांपासून बापू समाधी स्थळी जयंतीनिमित्त बुंदी लाडूंचा महाप्रसाद लाखो भाविकांना वितरित करण्याची परंपरा सुरू आहे. यंदाही गुरु पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या जन्मोत्सवासाठी देशभरातून दिंड्या, पालख्या व भक्तमंडळी २८ जुलैपासून श्रीक्षेत्र पोहरादेवीत दाखल होणार असून, २९ जुलै रोजी बापूंची जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे.
बापू संत डॉ. रामराव महाराज यांनी आपल्या आयुष्यात समाजाला केवळ अध्यात्माचा नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला. शिक्षण घ्या, व्यसनापासून दूर राहा, आपसातील भांडणे व तंटे टाळा आणि समाजहितासाठी कार्य करा, हा त्यांचा जीवनमंत्र आजही लाखो अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देविभक्त महंत शेखर महाराज आणि महंत संजय महाराज हे बापूंनी दिलेली ही सामाजिक व अध्यात्मिक शिकवण सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. देशभर भ्रमण करून समाजात ऐक्य, सेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य ते करत आहेत. त्यामुळे बापूंचा जन्मोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक प्रबोधनाचेही प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
बापू समाधी स्थळावरील तयारी अंतिम टप्प्यात असून, परिसरात स्वच्छता, महाप्रसाद, भाविकांच्या निवासाची व्यवस्था आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा शांतता, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News