बापू जन्मोत्सवासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवीत भाविकांचा महासागर; राज्यभरातून शेकडो पायदळ दिंड्यांचे आगमन
मानोरा : प्रतिनिधी
अखंड ब्रह्मचारी राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज (बापू) यांच्या ९१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून हजारो भाविक पोहरादेवीत दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो पायदळ दिंड्यांचे दिवसभर उत्साहात स्वागत करण्यात आले.
मंदिर परिसरात पालख्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि “बापू महाराज की जय”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. बापू आश्रमात पालखी पोहोचल्यावर धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी जगदंबादेवी मंदिर आणि संत सेवालाल महाराज मंदिराकडे मार्गस्थ झाली. पुढे बापू समाधीस्थळी आगमन झाल्यावर देविभक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेऊन बापूंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसरावर पोलिसांची विशेष नजर आहे.
आज बापू जन्मोत्सवानिमित्त भाविक दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेणार असून दिवसभर भजन, कीर्तन, पालखी सोहळे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत बापू जन्मोत्सवाचा सोहळा यंदाही उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होत आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
मराठी भाषेत रूढ झालेले अरबी, फार्सी व हिंदी भाषेतील शब्द
02 Sep 2026
नारीशक्तीचा दमदार एल्गार! महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगची राज्य कार्यकारिणी जाहीर
01 Sep 2026
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि एक्स प्रश्न ? -फुलसिंगजी जाधव, सामाजिक कार्यकर्ता
01 Sep 2026
तो खरा 'विमुक्त दिन' असेल
01 Sep 2026