आरक्षणासाठी आयुष्य झिजविणारा बंजारा समाजाचा ध्येयवेडा महामानव! पद्मश्री स्वातंत्र्यसैनिक स्व. रामसिंगजी भानावत : संघर्ष, विचार आणि बंजारा समाजाच्या हक्काची अखंड लढाई
मानोरा : बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री स्वातंत्र्यसैनिक रामसिंगजी भानावत हे समाजाच्या इतिहासातील एक ध्येयवेडे व्यक्तिमत्त्व होते. सत्ता, संपत्ती आणि व्यक्तिगत प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी बंजारा समाजाला देशभर समान सामाजिक न्याय व आरक्षण मिळावे, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे एका व्यक्तीला अभिवादन करण्याबरोबरच समाजाच्या हक्कासाठी लढलेल्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण होय.
बंजारा समाजाची संस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवनपद्धती देशाच्या विविध भागांत आढळते. मात्र वेगवेगळ्या राज्यांत या समाजाला वेगवेगळ्या आरक्षण प्रवर्गांमध्ये स्थान मिळाल्याचे भानावतजींच्या लक्षात आले. कुठे अनुसूचित जमाती, कुठे अनुसूचित जाती, तर कुठे इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त-भटक्या जमाती अशा स्वरूपात समाजाची विभागणी झाली होती. एकच समाज, समान सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि सामाजिक परिस्थिती असताना आरक्षणाच्या बाबतीत एवढी तफावत का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
समाजसेवेची शपथ आणि संघर्षाची सुरुवात
सन १९२७ मध्ये समाजसेवेच्या विचारांनी प्रेरित होऊन भानावतजींनी निरपेक्ष जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला. ठक्कर बाप्पांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यानंतर त्यांनी बंजारा व आदिवासी समाजाच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी देशातील विविध भागांचा दौरा केला. वेगवेगळ्या राज्यांतील आरक्षण व्यवस्था समजून घेतल्यानंतर बंजारा समाजाला समान हक्क मिळावेत, या मागणीसाठी त्यांनी संघटित प्रयत्न सुरू केले.
बंजारा समाजाचे महानायक वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून या मागणीला व्यापक दिशा मिळाली. १९५३ मध्ये दिग्रस येथे झालेल्या अखिल भारतीय बंजारा समाजाच्या अधिवेशनातून आरक्षणाच्या मागणीला संघटित स्वरूप मिळाले. या अधिवेशनाला तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री उपस्थित होते. त्यानंतर भानावतजींनी शिष्टमंडळासह शास्त्रीजींची भेट घेऊन प्रश्न मांडला. पुढे त्यांनी दिल्ली गाठून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुढेही बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला.
संसद भवनापासून लोकुर समितीपर्यंत पाठपुरावा
१९६३ मध्ये संसदेत बंजारा समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे आरक्षण देण्याच्या मागणीबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले, असा त्यांच्या संघर्षाच्या इतिहासातील महत्त्वाचा संदर्भ आहे. मात्र नेहरूंच्या निधनानंतर हा प्रश्न पुन्हा रखडला. तरीही भानावतजींनी पाठपुरावा सोडला नाही.
१९६५ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती लोकुर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आता घटनात्मक आधार मिळेल, अशी आशा निर्माण झाली. मात्र त्याच काळात लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले. राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वातील बदलांमुळे प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला.
दिल्लीतील महाअधिवेशनातून बुलंद झाला आवाज
२४ ऑगस्ट १९६६ रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय बंजारा समाजाचे महाअधिवेशन झाले. वसंतराव नाईक, रामसिंगजी भानावत, प्रतापसिंग आडे, के. टी. राठोड आणि अन्य नेत्यांच्या पुढाकाराने झालेल्या या अधिवेशनाला राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि यशवंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
या वेळी भानावतजींनी देशभरातील बंजारा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थिती तसेच विविध राज्यांतील आरक्षणातील तफावत मांडली. त्यांच्या दृष्टीने हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नव्हता, तर सामाजिक न्याय आणि घटनात्मक समानतेचा प्रश्न होता.
१९६७ मध्ये अनुसूचित जाती-जमाती संदर्भातील विधेयक संसदेत मांडण्यात आले; मात्र ते मंजूर झाले नाही. त्यानंतरही त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, पत्रव्यवहार केला आणि देशभरातील लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. १९७६ मध्येही पुन्हा विधेयक मांडण्यात आले; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही.
विरोध झालाविरोध झाला, तरी संघर्ष थांबला नाही
आरक्षणाच्या भूमिकेला काही ठिकाणी समाजातूनही विरोध झाला. तरीही भानावतजी आपल्या भूमिकेपासून मागे हटले नाहीत. समाजाच्या भवितव्यासाठी दीर्घकालीन संघर्ष करायचा असेल तर विरोध, अपयश आणि अडथळे यांना सामोरे जावे लागते, याची जाणीव त्यांच्या कार्यातून दिसून येते.
त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीच्या श्रेयासाठी नव्हता. बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी समान हक्क मिळवून देणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. आज आरक्षणासाठी आंदोलने होत असताना श्रेयवादापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्यातून मिळणारी महत्त्वाची शिकवण आहे.
बालवयातच अन्यायाविरुद्धची ठिणगी
भानावतजींच्या जीवनातील एक प्रसंग त्यांच्या चिकित्सक विचारांची साक्ष देतो. बंजारा समाजाला इंग्रजांच्या काळात गुन्हेगार जमातीच्या यादीत टाकण्यात आले होते, ही माहिती इयत्ता तिसरीत असताना शिक्षकांकडून त्यांना मिळाली. बालमनाला हा अन्याय अस्वस्थ करून गेला. पुढे हाच सामाजिक प्रश्न त्यांच्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू बनला.
पद्मश्रीने झाला कार्याचा गौरव
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि बंजारा समाजाच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे रामसिंगजी भानावत यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेत त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. हा सन्मान त्यांच्या व्यक्तिगत कार्याचा गौरव असला तरी त्यामागे समाजाच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या प्रदीर्घ संघर्षाची राष्ट्रीय पातळीवरील दखल होती.
आज त्यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली ठरेल. एकजूट हा त्यांच्या संघर्षाचा वारसा, सामाजिक न्याय हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आणि समाजहिताला श्रेयवादापेक्षा वरचे स्थान देणे हा त्यांच्या जीवनाचा संदेश होता.
भानावतजींच्या संघर्षातून आजच्या पिढीने इतिहास समजून घेत समाजाच्या प्रश्नांना व्यापक आणि संघटित दृष्टिकोनातून सामोरे जाण्याची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या त्यागाला, संघर्षाला आणि समाजहिताच्या कार्याला विनम्र अभिवादन.
“व्यक्ती संपते; विचार संपत नाहीत. संघर्ष संपतो; पण संघर्षातून जन्मलेला हक्काचा आवाज पिढ्यान्पिढ्या घुमत राहतो.”
— संजय भानावत
कार्यकारी अधिष्ठाता,
विश्व बंजारा समाज सांस्कृतिक शोधपीठ, फुलउमरी
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News