Site Logo
वाशिम जिल्हा

पुसद–फुलउमरी बससेवा सुरू; विद्यार्थी, रुग्णांसह नागरिकांना मोठा दिलासा

प्रकाशित: 06 Aug 2026, 02:50 PM
196 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी :फुलउमरी, सोमेश्वर नगर व परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून पुसद–फुलउमरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे शिक्षण, आरोग्य व दैनंदिन कामांसाठी पुसदला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

यापूर्वी परिसरातील नागरिकांना पुसदला जाण्यासाठी दिग्रसमार्गे वळसा घालावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता. आता ही बस गहुली–चोंढी मार्गे थेट पुसदला धावू लागल्याने प्रवास अधिक सोयीचा आणि कमी वेळेत होणार आहे.

पुसद येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी, रुग्णालयात उपचार व आरोग्य तपासणीसाठी नियमित जाणारे नागरिक, तसेच खासगी कामांसाठी प्रवास करणाऱ्यांना या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे फुलउमरी, सोमेश्वर नगर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत.

दररोज सकाळी १० वाजता पुसद आगाराची बस फुलउमरी येथे येणार असून, सायंकाळी ४ वाजता परतीची सेवा उपलब्ध राहणार आहे. या बससेवेमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: