कायम दिव्यांगांनाही तात्पुरते UDID कार्ड; मानोरा तालुक्यात संताप
मानोरा : शासनाच्या नव्या नियमानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत नव्याने UDID (Unique Disability ID) कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, कायमस्वरूपी दिव्यांग असलेल्या व्यक्तींनाही तात्पुरते UDID कार्ड दिले जात असल्याने मानोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कोंडोली येथील वयोवृद्ध दिव्यांग महिला त्रिवेणी श्रावण पवार यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी वाशिम येथे जाऊन UDID कार्ड काढले. त्यांचा UDID क्रमांक MH4930520530014228 आहे. त्या कायमस्वरूपी दिव्यांग असूनही त्यांना कायमस्वरूपीऐवजी तात्पुरते UDID कार्ड देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
UDID कार्ड मिळविण्यासाठी वयोवृद्ध आणि गंभीर दिव्यांगांना वाशिमपर्यंत प्रवास करावा लागतो. शारीरिक त्रास सहन करून, सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्यानंतरही कायम अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांना तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने हा प्रकार दिव्यांगांवरील अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की, त्यांना शासकीय नोकरीची अपेक्षा नसून केवळ मानधन व इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. मात्र, तात्पुरत्या UDID कार्डमुळे अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी दिव्यांगांना कायमस्वरूपी UDID कार्ड देण्याची मागणी जोर धरत आहे.
यात भर म्हणजे, तालुक्यातील अनेक दिव्यांगांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन रखडले आहे. मानधनाच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेल्यास "साईट बंद आहे" असे उत्तर मिळत असल्याची तक्रार दिव्यांगांनी केली आहे. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या अनेक वयोवृद्ध दिव्यांगांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिव्यांगांवरील हा प्रशासकीय गुंता तातडीने सोडवून कायमस्वरूपी दिव्यांगांना कायम UDID कार्ड देण्यात यावे, रखडलेले मानधन त्वरित वितरित करावे तसेच दिव्यांगांना होणारी हेलपाटे थांबवावीत, अशी मागणी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
पोहरादेवी दर्शन
लेखक / संपादक
Poharadevi Darshan News
संबंधित बातम्या
धानोरा बु. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; ग्रामस्थ आक्रमक विशेष ग्रामसभा घेण्याची
09 Sep 2026
ग्रामीण ग्राहकांसाठी एलपीजी बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द आता २५ दिवसांनीच पुन्हा सिलिंडर बुकिंगची सुविधा
09 Sep 2026
ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी; आरटीआयने उघडणार पाच वर्षांचा कारभार!
01 Sep 2026
राशनच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन; फुलउमरीत अनोख्या आंदोलनाने खळबळ
29 Aug 2026